पारनेरजवळील सिद्धेश्वर

पारनेरजवळील सिद्धेश्वर | Firasti Maharashtrachi

नगर जिल्हा! निजामशाहीचे अस्तित्व आपल्या अंगाखांद्यावर खेळवत अनेक वारसा स्थळांनी समृद्ध असलेल्या या जिल्ह्यात काय नाही! किल्ले, लेणी, मंदिरे यांची अक्षरशः रेलचेल या अहमदनगर मध्ये. असेच एक आडवाटेवर असणारे मंदिर आहे ते नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात. पारनेर तालुका तसा प्रसिद्ध आहे तो जवळ असणाऱ्या राळेगणसिद्धी गावामुळे. पण पारनेर गावापासून साधारण ५-६ किमी अंतरावर निसर्गाच्या सानिद्ध्यात सिद्धेश्वराचे एक सुंदर मंदिर वसले आहे.

पारनेरजवळील सिद्धेश्वर


दोन डोंगर एकमेकांना जोडताना जी नैसर्गिक दरी तयार होते त्या दरीच्या अगदी बेचक्यात हे मंदिर आहे. त्यामुळे पावसाळ्यात या मंदिराचा परिसर अत्यंत खुलून दिसतो. मंदिराला भेट द्यायची असल्यास पारनेर कडून नगर-कल्याण महामार्गाच्या दिशेने ५-६ किमी जावे. तिथे सिद्धेश्वरवाडी असा फलक डावीकडे दिसतो. तिथून आत शिरल्यावर पुढे अगदी दहाव्या मिनिटाला गाडी मंदिराजवळ येऊन पोहोचते. सध्याचे मंदिर हे पेशवे काळातील आहे परंतु मंदिराजवळ असणारे मूर्तींचे अवशेष तसेच तेथील चतुष्की हे सगळ पाहिल्यावर कदाचित जुने मंदिर यादवकाळातील असावे अस वाटते. पुढे कदाचित मुसलमानी आक्रमणात ते पडले आणि मग पेशवे काळात त्याची उभारणी पुन्हा झाली असावी असे वाटते.

सिद्धेश्वर
सिद्धेश्वर

मंदिराच्या परिसरात अनेक ठिकाणी बांध घालून पाणी अडवलेले दिसून येते. अशाच एका बांधावरून चालत मंदिराकडे जाता येते. तत्पूर्वी बांधावरून उजवीकडे वळल्यास मराठा काळातील पक्क्या विटांनी बांधलेली एक धर्मशाळा दिसून येते. त्याच्या पुढे पुष्करणी असून तिच्या भिंतीत देवनागरी मधला एक शिलालेख कोरलेला दिसून येतो. या लेखाची तारीख ६ नोव्हेंबर १७६७ अशी येते. व्यंकटेश नावाचे एक सत्पुरुष येथे समाधिस्त झाले असा तो मजकूर आहे. धर्मशाळा बघून आपण आता मंदिराकडे येतो. सध्या असणाऱ्या मंदिराला रंग देऊन त्याचे मूळपण घालवले असले तरी त्याच्या भव्यतेची कल्पना आपल्याला लगेच कळून येते. सिद्धेश्वर मंदिराचे एक वैशिष्ट्य म्हणजे येथे वसई विजयातून मराठ्यांनी ज्या चर्च बेल्स आणल्या आणि आपल्या आपल्या देवतांना अर्पण केल्या, त्यातील एक घंटा येथे आपल्याला दिसून येते. या घंटेवर ख्रिश्चन धर्मियांचा क्रॉस कोरलेला दिसून येतो.

चतुश्की
पोर्तुगीज घंटा

ही घंटा सध्या जिथे टांगली आहे त्या बांधकामाला चतुष्की असे म्हणतात. बदामी चालुक्यांच्या बांधकाम शैलीत अशा प्रकारचे बांधकाम दिसून येते. चतुष्कीचा उपयोग २ प्रकारे झालेला दिसून येतो. यात यज्ञ करण्यासाठी जागा सोडलेली दिसून येते किंवा शिष्यांना ज्ञान देण्यासाठी. भुलेश्वर येथील जी चतुष्की आहे ती दुसऱ्या प्रकारात मोडते. पारनेर येथील सिद्धेश्वरमध्ये यज्ञासाठी त्या चतुष्कीचा वापर केला असण्याची शक्यता जास्त आहे. चतुष्की बघून आपण दरवाजाने मंदिरात प्रवेश करतो. मंदिर हे अत्यंत साधे असून आतमध्ये कोणत्याही प्रकारचे कोरीवकाम दिसून येत नाही.

एक वेगळी गोष्ट येथे दिसून येते ती म्हणजे मंदिरातील नंदीचे स्थान. इतर शिवाच्या मंदिरात नंदीचे स्थान आहे पिंडीच्या बरोबर समोरच्या बाजूला असते परंतु येथे नंदीमंडप हा विरुद्ध बाजूला असलेला दिसून येतो.
   मंदिराचा परिसर हा अत्यंत आल्हाददायक आहे. मंदिराच्या मागच्या बाजूला आवारात गणपती, विष्णू, शंकर पार्वती यांच्या जुन्या मूर्ती ठेवलेल्या दिसून येतात. कदाचित प्राचीन मंदिरात या मूर्ती असाव्यात असे वाटते. मंदिराच्या मागे असलेल्या दरीत उतरण्यासाठी पायऱ्या असून पक्षीनिरीक्षण करण्यासाठी ही उत्तम जागा आहे. मंदिराच्या शेजारी उत्तम बांधकाम असलेली पुष्करणी आहे.

मंदिराजवळ असणारी पुष्करणी
मंदिराजवळ असणारी पुष्करणी
मंदिराजवळ असणारी धर्मशाळा
र्मशाळेसमोर असणाऱ्या पुष्करणीमधील लेख (लेखाचे वाचन श्री. महेश तेंडूलकर यांच्या ‘मराठी-संस्कृत शिलालेखांच्या विश्वात या पुस्तकात दिले आहे’)

पुण्यापासून पारनेर आणि परिसर हा एका दिवसात सहज बघून होऊ शकतो. जवळ असलेल्या पारनेर गावाला सुद्धा बराच मोठा इतिहास लाभला आहे. सेनापती बापट यांचा जन्म हा पारनेर गावातला. मध्ययुगीन कालखंडात पारनेर गावाभोवती तटबंदी होती याचे पुरावे आज आपल्याला बुरुजांच्या रूपाने दिसून येतात. पारनेर तालुका, सिद्धेश्वर मंदिर, टाकळी ढोकेश्वरची लेणी, निघोजचे रांजणखळगे, मोराची चिंचोली अशी उत्तम पर्यटनस्थळे इथे आहे. अर्थात नेहमीप्रमाणे सरकार दरबारी उदासीनता असल्याने हे परिसराचा व्हायला हवा होता तसा विकास झाला नाही अन्यथा पारनेर तालुका एक महत्वाचे पर्यटनस्थळ म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध होऊ शकतो.    

© 2019, Shantanu Paranjape

www.shantanuparanjape.com

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!