महाराष्ट्रातील भौगोलिक आश्चर्य

निसर्गामध्ये फिरताना डोळे उघडे ठेऊन आपण भटकंती केली तर आपल्याला बऱ्याच गोष्टी गवसू शकतात यामध्ये काही आश्चर्यकारक भौगोलिक गोष्टी, नैसर्गिक गोष्टी तसेच काही छोटे छोटे प्राणी, पक्षी, फुलपाखरे अश्या निसर्गाच्या घटकांची माहिती होतेच तसेच काही भौगोलिक गोष्टी अश्या देखील आपल्याला निसर्गात आपल्याला पहायला मिळतात त्या गोष्टी पाहून नक्कीच आपल्या मनाला प्रश्न पडतो की हे नक्की कोणी घडवले असेल किंवा या गोष्टी कश्यामुळे तयार झाल्या असाव्यात असे प्रश्न नक्कीच पडतात आणि मग सुरु होतो या भौगोलिक आश्चर्याचा. अशीच काही भौगोलिक आश्चर्य आपल्या महाराष्ट्रात लपलेली असून सर्व सामान्य लोकांना ती माहिती नसतात अश्याच महाराष्ट्राच्या भौगोलिक आश्चर्यांचा मागोवा घेऊ.

‘राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा’ असे हे सुंदर वर्णन आपल्या महाराष्ट्राचे केलेले आहे. महाराष्ट्राचे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे महाराष्ट्रातील ‘खडक’ त्यामुळे महाराष्ट्रात अशी अनेक विविध भौगोलिक गोष्टी तयार झालेल्या आपल्याला बघायला मिळतात. किल्ले, लेणी, मंदिरे, आणि भौगोलिक विविधता असणारा आपला महाराष्ट्र नक्कीच एक वेगळेपण सिद्ध करतो. महाराष्ट्रात काही ठिकाणी भटकंती केली असता आपल्याला काही भौगोलिक गोष्टी महाराष्ट्राच्या परिसरात सापडतात अशीच काही ठिकाणे पुढीलप्रमाणे:-

उनव्हरे गावातील ‘गरम पाण्याची कुंडे’:-

रत्नागिरी जिल्ह्यातील ‘खेड’ तालुक्यापासून ३० किलोमीटर अंतरावर ‘उनव्हरे’ गावामध्ये. या ‘उनव्हरे’ गावामध्ये आपल्याला ‘गरम पाण्याची कुंडे’ आहेत. ‘उन्हवरे’ गावाची हि कुंडे आजूबाजूच्या पंचक्रोशीत प्रसिद्ध आहेत ती त्यांच्या गरम पाण्यामुळे. हि कुंडे फारशी प्रसिद्धी झोतात नाहीत त्यामुळे या कुंडाच्या आजूबाजूचा निसर्गरम्य परिसर टिकून राहिला आहे. ‘वसिष्ठी’ नदीच्या एका ओढ्याच्या तीरावर जवळपास ६ कुंडे आहेत. ‘उनव्हरे’ येथील या गरम पाण्याच्या कुंडातील तापमान साधारणतः ४८ ते ५० सें च्या दरम्यान असते. ह्या निसर्गनिर्मित कुंडामधील पाणी हे गंधकयुक्त आहे. या पाण्याने आंघोळ केली असता आपल्या त्वचेचे रोग बरे होतात. या गरम पाण्याच्या कुंडांमध्ये रिकाम्यापोटी जाऊ नये अन्यथा चक्कर येणे किंवा हातापायात गोळे येणे अश्या अडचणी येऊ शकतात. संपूर्ण खबरदारी घेऊन कुंडामध्ये मनसोक्त जलतरणाचा आनंद घ्यावा.

प्रचितगड किल्याजवळ असलेले पाषाणांचे सडे:-

प्रचितगड किल्ला तसा दुर्गमच परंतु या प्रचितगडावरून ‘कंदारडोह’ या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या धबधब्याकडे जाताना पठार लागते या पठारावर काळेकुळकुळीत छोट्या मोठ्या आकाराचे दगड हे पसरलेले आपल्याला दिसतात यांना कातळसडे असे म्हणतात. आणि यावरच्या दगडांना ‘मुकुट गोटे’ असे संबोधतात. हे कातळसडे म्हणजे बेसॉल्टने तयार झालेली पठारे. कातळ म्हणजे बेसॉल्ट आणि सडा म्हणजे ‘जांभ्या दगडाचा’ सडा. हे कातळसडे म्हणजे बेसॉल्टच्या काळ्या पाषाणावर झीज झालेल्या जांभा दगडाचा थर बसलेला असतो तो म्हणजे कातळसडा. ज्वालामुखीच्या उद्रेकाच्या वेळेस थंड होत गेलेल्या लाव्ह्याचे एकमेकांवर जे थर सात जातात याच्यातून कातळसडा तयार होतो. सह्याद्रीमध्ये साधारणपणे ७०० ते१४०० मीटर उंचीवर हे कातळसडे आढळून येतात. या कातळसड्यांचे वैशिष्ट्य म्हणजे या सड्यांच्या वाटेला आलटून पालटून येणारे ऋतु पावसाळा संपत आल्यावर हे सडे अक्षरशः फुलांनी भरलेले असतात. कीटकभक्षी वनस्पती या सड्यांचे एक वैशिष्ट्य आहे. तसेच इतरही अन्केचोती आणि सुंदर फुले या सड्यांवर उगवतात आणि या सड्यांना एक वेगळा साज देतात. उन्हाळ्यात मात्र हेच सडे अक्षरशः भाजून काढतात कारण त्या भागातील मातीची धूप मोठ्या प्रमाणात झालेली असते म्हणून या सड्यांच्या परिसरात जैवविविधता मोठ्या प्रमाणात दिसून येते.

घोरावडेश्वरची अग्निजजन्य गुहा:-‘तळेगाव’ पासून जवळ असलेला ‘घोरावडेश्वर’ डोंगर हा प्रसिद्ध आहे ते त्याच्या प्राचीन लेण्यांमुळे येथील प्राचीन लेणी मानवाच्या अतित्वाच्या पाउलखुणा सांगतात तर येथेच ‘घोरावडेश्वर’ डोंगरावर लेण्यांच्यापेक्षा प्राचीन गुहा आजही आपले अस्तित्व दाखवून लोकांना खुणावत आहे. ती प्राचीन गुहा हि ज्वालामुखीची अग्निजजन्य गुहा आहे. आता ह्या गुहा किंवा हि विवरे बनतात कशी हा प्रश्न पडलाच असेल तर त्यासाठी आपल्याला काही गोष्टी अभ्यासाव्या लागतात. आपले दख्खनचे पठार हे निर्माण होण्यासाठी पृथ्वीच्या पोटातून लाव्हारस बाहेर आला पण तो कधी विशिष्ट मुखांमधून बाहेर पडला. लाव्हारस प्रवाह वाहत असताना आणि थंड होताना एक लांब पोकळी राहते.

काही काळानंतर डोंगर उतारावर असलेल्या मातीची धूप होऊन जाते आणि पावसाळ्यात वाहत्या पाण्यामुळे अशी एखादी विवर-गुहा दृष्टीक्षेपात पडू लागते. सह्याद्रीतल्या अग्निजन्य बेसॉल्ट खडकात अशी विवरे मोठ्या प्रमाणात आढळतात.लाव्हारस ज्या ठिकाणावरून बाहेर पडला त्या केंद्रापैकी काही महाकाय केंद्रे होती तर काही आकाराने दुय्यम होती किंवा छोटी होती. दख्खनच्या पठाराच्या निर्मितीमध्ये मोठ्या केंद्रांप्रमाणे छोटी केंद्र देखील फार महत्वपूर्ण आहेत. या छोट्या केंद्रांच्या खाणाखुणा या छोट्या टेकड्यांवर मोठ्या प्रमाणात आढळून येतात. त्यापैकी हे घोरवडेश्वर येथील टेकडीवर असलेले हे केंद्र तेवढेच महत्वाचे आहे. ज्वालामुखीच्या उद्रेकाची मोठी केंद्रे आपल्या महाराष्ट्रात फार कमी ठिकाणी पाहायला मिळतात परंतु लहान लहान केंद्रे खूप डोंगरांवर आणि टेकड्यांवर दिसून येतात. या ज्वालामुखी विवरांबद्दल एकदा आपल्याला माहिती समजली तर ज्वालामुखीचे इतके जुने अवशेष किंवा ज्वालामुखीच्या या गुहा आपल्या भटकंती मध्ये पहिल्याचा नक्कीच आनंद होतो.

वडगाव दऱ्या येथील लवण स्तंभ:-

नगर जिल्ह्यामध्ये फारसे परिचित नसलेले दऱ्या बाईचे मंदिर आहे. या दऱ्याबाईच्या गुहेत आणि त्याच्या शेजारी असलेल्या गुहेमध्ये आपल्याला निसर्गाचे नवल असलेले लवणस्तंभ पाहायला मिळतात. हे लवण स्तंभ पाहायचे असतील तर तुम्हाला विजेरी नेणे नक्की फायद्याचे ठरेल कारण हे स्तंभ अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहेत. हे स्तंभ कसे तयार होतात याची माहिती घ्यायची असेल तर याठिकाणी जायलाच हवे.

एखाद्या खडकाच्या कॅल्शिअम म्हणजेच जर चुन्याच्या क्षारचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असेल तर तेथे मुरलेल्या पाण्याचे झिरपणे खडकाच्या भेगा आणि फटीतून मोठ्या प्रमाणात होते. या बाहेर पडणाऱ्या पाण्यात क्षाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते. पाण्याबरोबर हे क्षार विरघळत जातात आणि बाहेर पडतात. परंतु याठिकाणी जर पाण्याचा ठिबकणारा थेंब जर तेथे खडकावर तसाच राहिला तर तो क्षार तेथे साचून राहतो आणि पाण्याची वाफ होऊन तेथे क्षराच्या कांड्या तयार व्हायला लागतात. या घटनेला होण्यासाठी लाखो वर्षांचा अवधी लागतो. असे हे लवण स्तंभ हे वडगाव दऱ्या येथे आहेत. अश्या आडवाटेवर असलेल्या महाराष्ट्राच्या भौगोलिक आश्चर्यांचा मागोवा घेऊन आपली भटकंती हि अधिक नवीन दिशेकडे नक्की वळते आणि या सर्व गोष्टीचा अभ्यासपूर्ण भटकंती करताना नक्कीच उपयोग होतो.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!