मराठवाडा म्हणजे संतांची आणि साहित्याचा वारसा लाभलेली भूमी. २२४ वर्ष निजाम राजवटी खाली राहिल्याने भारताच्या इतिहासात काहीसा दुर्लक्षित राहिलेला भाग म्हणजे मराठवाडा. १९६० साली महाराष्ट्रात समावेश झाल्यानंतरही भौगोलिक रचनेनुसार मुंबई-पुणे पासून दूर असल्याने हा भाग काहीसा दुर्लक्षितच राहिला. त्यामुळे मराठवाड्यातील औरंगाबाद वगळता इतर पर्यटन स्थळे आजही महाराष्ट्राच्या इतर भागातील लोकांसाठी काहीशी अपरिचितच आहेत.
मराठवाड्यात अंबाजोगाई हे एक असे शहर आहे ज्याला धार्मिक, सांस्कृतिक आणि साहित्याचाही वारसा लाभलेला आहे. मराठीतील आद्यकवी मुकुंदराज हे अंबाजोगाईचेच. त्यांची समाधी या शहरांमध्ये आहे. अंबाजोगाई हे मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील एक तालुक्याचे ठिकाण. आपण पुणे किंवा मुंबईवरून या शहराला भेट देण्यासाठी येत असाल तर जवळचे रेल्वे स्थानक परळी-वैद्यनाथ आहे. तसेच लातूर या जिल्हा स्थानापासूनही अंबाजोगाई फक्त ५० किलोमीटर दूर आहे. या शहरातील योगेश्वरी देवी म्हणजे बहुतांश कोकणस्थांची कुलदैवत. कोकण विभागापासून अंबाजोगाई बरेच दूर असले तरीही कोकणी लोक आवर्जून या देवीच्या दर्शनासाठी येत असतात. योगेश्वरी देवीचे मंदिर साधारणतः ७०० वर्ष जुने असल्याचे सांगितले जाते. याच देवीच्या संदर्भात एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ अंबाजोगाई शहरामध्ये आहे. हे पर्यटन स्थळ म्हणजे हत्तीखाना लेणी.

हत्तीखाना ही अजिंठा-वेरूळ प्रमाणेच बीड जिल्ह्यातील एक प्रसिद्ध लेणी आहे. या लेणीच्या निर्मितीलाही साधारणतः १००० वर्षाचा इतिहास आहे.
हत्तीखाना हे लेणी स्थळ मानवनिर्मित आहे की चमत्कार याबद्दल बरीच मतमतांतरे आहेत. काही इतिहासकारांच्या मते या लेणीची निर्मिती अकराव्या शतकामध्ये झाली जेव्हा या परिसरात देवगिरीच्या यादवांचे राज्य होते. चार टेकड्या फोडून तेथील खडकांमध्ये हत्तींचे शिल्प कोरण्यात आले. तसेच लग्न मंडप आणि सभामंडपाची देखील निर्मिती करण्यात आली. येथील लग्नमंडपात शंकराचे वाहन नंदीचेही शिल्प कोरले आहे. तसेच सभामंडपाची निर्मितीही ३६ खांबावर केली आहे. आणि सभामंडपाच्या भिंतींवर मुर्त्यांचे शिल्प कोरले आहे. हत्तीखाना हे स्थळ जैन लेणी किंवा शिव लेणी म्हणूनही प्रसिद्ध आहे.
हत्तीखाना लेणी बद्दलची दुसरी दंतकथा म्हणजे या लेणीचे निर्माण एका चमत्कारातून घडले असे सांगितल्या जाते. योगेश्वरी देवीचा परळी येथील वैद्यनाथ देवाशी विवाह ठरला होता. परळी वैद्यनाथ म्हणजे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले धार्मिक स्थळ. पण लग्नाच्या पूर्वी एका ऋषींकडून श्राप मिळतो की लग्न जर सूर्योदयापूर्वी म्हणजेच कोंबडा बांग देण्यापूर्वी पार नाही पडले तर संपूर्ण लग्न मंडपाचे रूपांतर दगडामध्ये होईल. दुर्दैवाने कोंबड्याने बांग देण्यापूर्वी हे लग्न पार पडले नाही आणि येथील मंडप तसेच सर्व सजीवांचे दगडा मध्ये रूपांतर झाले. येथे दिसणारे हत्तीचे शिल्प म्हणजे त्याकाळी जिवंत हत्ती असल्याचे बोलले जाते. येथील नंदीचे शिल्प म्हणजे वैद्यनाथ देवाचा खरा नंदी असल्याचे बोलले जाते. कदाचित यामुळेच तेथे नंदीचे शिल्प सापडते पण शंकराचे मंदिर दिसत नाही. शंकराचे मंदिर हे ज्योतिर्लिंगाच्या रूपाने परळी येथे दिसते.
हत्तीखाना बद्दलची वास्तविकता जी काही असेल ती असेल. पण साधारणतः अकराव्या शतकापासून तरी या लेणीचे संदर्भ इतिहासकारांकडून मिळतात. या लेणी मध्ये एक भुयारी मार्ग असल्याचे देखील सांगितले जाते. हा भुयारी मार्ग २७ किलोमीटर दूर परळी-वैद्यनाथ मंदिराच्या मागे निघतो असे म्हणतात. या पर्यटन स्थळाला एक हजार वर्षाचा ऐतिहासिक, धार्मिक वारसा असूनही आज हा वारसा मोडकळीस आल्याचे जाणवते. येथील स्थानिक प्रशासन आणि पुरातत्त्व खात्यातर्फे म्हणावी तशी पर्यटन स्थळाची जपणूक झालेली दिसत नाही. हत्तीखानाच्या परिसरात अस्वच्छताही प्रचंड जाणवते. येथील शिल्पांवर स्वतःचे नाव कोरणारे महाभागही सापडतात. ही लेणी कदाचित मुंबई-पुणे सारख्या शहरी भागाजवळ असती तर नक्कीच आपोआप जपनुकही झाली असती.
वेरूळ, अजिंठा, कारला, एलिफंटा येथील लेण्याप्रमाणे अंबाजोगाई येथील हत्तीखाना ही लेणी फारशी प्रसिद्ध नसली तरीही या पर्यटन स्थळाला १००० वर्षाचा इतिहास लाभला आहे हे नक्कीच लक्षात घ्यायला हवे. स्थानिक प्रशासन आणि पुरातत्त्व खात्याने लोक सहभागातून या पर्यटन स्थळाकडे लक्ष द्यायला सुरुवात केली तर येणाऱ्या काळात या शहराचा धार्मिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक वारसा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नक्कीच पोहचू शकतो.
लेखक : राहुल बोर्डे, पुणे
मो : 9822966525