राजारामास राजसबाईपासून झालेला मुलगा श्री राजा शंभुछत्रपती हा कोल्हापूरच्या गादीवर आल्यानंतर (१७१४) त्यांच्या आज्ञेवरून रामचंद्र पंडित अमात्य हुकुमतपन्हा यांनी हे आज्ञापत्र १७१५-१६ च्या सुमारास लिहिले. हे आज्ञापत्र लिहिण्यामागील प्रमुख हेतू दोन : “राजकुमार राजकार्यी सुशिक्षित व्हावेत” हा एक आणि “वरकड देशोदेशी ठेविले देशाधिकारी व पारपत्यागार यांणी नीतीने वर्तोन राज्य संरक्षण करावे” हा दुसरा.
रामचंद्रपंत अमात्य ह्यांचे मूळनाम रामचंद्रपंत भादाणेकर. पंधराव्या शतकामध्ये कल्याण प्रांतामधील भादाणे गावचे हे कुलकर्णी. पुढे ह्या घराण्यातील सोनोपंत हे शाहजी राजांच्या दरबारी होते. शिवरायांच्या काळात त्यांना डबीर अशी पदवी होती. सोनोपंत ह्यांना निळोपंत आणि आबाजी सोनदेव हे दोन पुत्र.
निळोपंतांच्या मृत्युनंतर १६७२ -७३ च्या सुमारास त्यांचा मुलगा रामचंद्र ह्याला अमात्यपद मिळाले. शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये पंतप्रधान मोरोपंत पिंगळे ह्यानंतर अमात्यपद हे अतिशय महत्त्वाचे होते. संभाजी राजांच्या काळात रामचंद्रपंत हे सचिव पदावर होते. पुढे राजाराम महाराज जिंजी येथे गेल्यानंतर रामचंद्र पंत यांनी महाराष्ट्रात राहून औरंगजेबाच्या सैन्याचा सामना केला. त्यावेळी त्यांना ‘हुकुमतपन्हा’ असा किताब मिळाला होता. रामचंद्रपंत अमात्य यांची कारकीर्द प्रचंड मोठी होती त्यामुळे त्यांना राज्यकारभाराचा मोठा अनुभव होता त्यामुळेच आज्ञापत्र या ग्रंथाला मोठे महत्व येते.
आज्ञापत्र या ग्रंथात शिवाजी राजांची दुर्गनीती सांगितली आहे. ‘संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग’ अशा प्रकारे आज्ञापत्रात दुर्गांचे महत्व विषद होते.
“संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग. दुर्ग नसता मोकळा देश परचक्र येताच निराश्रय, प्रजा भग्न होऊन देश उद्ध्वस्त होतो. देशच उद्ध्वस्त झाल्यावरी राज्य असे कोणास म्हणावे? या करता पूर्वी जे जे राजे जाहले त्यांनी आधी देशामध्ये दुर्ग बांधून तो देश शाश्वत करून घेतला. आले परचक्र संकट दुर्गाश्रयी परिहार केले. हे राज्य तरी तीर्थरूप थोरले कैलासवासी स्वामींनी गडावरूनच निर्माण केले. सालेरी आहीवंतापासोन कावेरीतीरपर्यंत निष्कंटक राज्य संपादिले. ज्यापेक्षा राज्यसंरक्षण करणे आहे, त्यापेक्षा अधिकोत्तर साधनी स्वत: गडकिल्ल्यांची उपेक्षा न करिता, परम सावधपणे असतील त्या गडकिल्ल्यांची थोर मजबुती करावी. ज्यास राज्य पाहिजे त्यांनी गडकोट हेच राज्य, गडकोट म्हणजे राज्याचे मूळ, गडकोट म्हणजे खजिना, गडकोट म्हणजे सैन्याचे बल, गडकोट म्हणजे राज्यलक्ष्मी, गडकोट म्हणजे आपली वसतीस्थळे, गडकोट म्हणजे सुखनिद्रागार, किंबहुना गडकोट म्हणजे आपले प्राणसंरक्षण असे पूर्ण चित्तात आणून कोणाचे भरवशावर न राहता त्यांचे संरक्षण करणे व नूतन बांधण्याचा हव्यास स्वत:च करावा. कोणाचा विश्वास मानू नये”
महाराष्ट्रात एवढे किल्ले का आहेत, त्यांचे प्रयोजन काय तसेच महाराज किल्ल्यांवर एवढा खर्च का करत असत याचे उत्तर आपल्या वरील उताऱ्यातून मिळते. एक गड बांधला असता आजूबाजूच्या परिसरावर लक्ष ठेवता येते हे मराठ्यांना कळून चुकले होते त्यामुळेच महाराष्ट्रात सुमारे ४०० पेक्षा अधिक किल्ले आपल्याला बांधलेले दिसून येतात. गडकोट हा स्वराज्याचा प्राण होता आणि त्याच प्राणाच्या जोरावर मराठे औरंगजेबासारख्या माणसाला महाराष्ट्रात २८ वर्षे झुंजवू शकले.