रविवार पेठेचे मुळचे नाव हे ‘मलकापूर’ पेठ. अहमदनगरच्या निजामशाहीचा वजीर मलिक अंबर याच्या नावावरून ही पेठ वसवण्यात आली. पुण्यात शिवाजी महाराजांचे वास्तव्य होण्याच्या आधीपासून या पेठेत व्यापारी लोकांची वस्ती होती. पुढे नानासाहेब पेशव्यांच्या काळात म्हणजे सन १७४०-१७४१ च्या दरम्यान या पेठेची पुनर्रचना महाजन व्यवहारे-जोशी यांनी केली.
या पेठेत पूर्वीपासूनच सावकारांचे आणि व्यापाऱ्यांचे वास्तव्य आहे. खालच्या मजल्यावर दुकान आणि वर घर अशी साधारण या पेठेतील घरांची रचना होती. ज्या प्रकारचे जिन्नस येथे विकले जात त्यावरून या पेठेतील भागांना त्यांची नावे पडली. उदाहरणार्थ मोती चौक, सराफ आळी, बोहरी आळी, कापड गंज. येथे तांबे आणि पितळ या दोन धातूंपासून बनवलेल्या भांड्यांचा व्यापार होत असे. ही भांडी बिदर, हैदराबाद तसे भारतातील इतर शहरात सुद्धा विकली जात. या पेठेत सर्व जातीचे आणि धर्माचे लोक राहत असत. सन १८०० मध्ये या पेठेत सुमारे २००० घरे होती यावरून पेठ किती गजबजली असेल याचा अंदाज येतो. पुढे इंग्रजांच्या आमदनीत पेठेतील रहिवाशांची संख्या रोडावली आणि सन १८३० मध्ये हीच संख्या २००० वरून ६६६ वरती आली.
या पेठेत सरदार हरिपंत फडके यांचा वाडा होता. हा वाडा सन १७९४-९९ च्या दरम्यान बांधण्यात आला. वाड्यात तब्बल ७ चौक होते आणि वाड्यात असणाऱ्या भाडेकरुंच्या कडून वर्षाकाठी तब्बल १५०० रुपये इतके उत्पन्न मिळत असे. यावरून वाड्याची भव्यता कळून येते. वाड्यात कात्रज येथील तलावातून पाण्याचा पुरवठा होत असे.
संदर्भ – Pune district Gazetter, Pg. 278.