प्राचीन महाराष्ट्रातील राजे – सातवाहन राजघराणे

महाराष्ट्राचा राजकीय इतिहास पुराव्यानिशी लिहायचा झाल्यास तो सातवाहनांन पासून लिहावा लागेल. कारण त्यांनीच महाराष्ट्राला भारतीय राजकारणाच्या नकाशावर स्थान मिळवून दिले. मौर्यांनी जशी ग्रीक आक्रमणे परतवून लावली त्याच प्रमाणे सातवाहनांनी शक आणि क्षत्रपांची आक्रमणे परतवून लावली. त्यांच्या पासूनच महाराष्ट्रात एकछत्री अंमल सुरू झाला. इ.स.पू. २३० ते इ.स. २३० अशी ४६० वर्षे राज्य करणारे सातवाहन हे महाराष्ट्रातील एकमेव घराणे होय.

सातकर्णी पहिला राजाचे नाणे

सातवाहनांनी महाराष्ट्राच्या राजकीय आणि सांस्कृतिक इतिहासात नवे दालन उघडले. त्यांच्या काळात महाराष्ट्राला स्थैर्य प्राप्त झाले व त्याची आर्थिक समृद्धीकडे वाटचाल सुरू झाली. महाराष्ट्रातील तेर, पैठण यासारख्या व्यापारी शहरांचे पाश्चिमात्य जगातील रोम, अथेन्स सारख्या शहरांशी प्रत्यक्ष संबंध आले. महाराष्ट्रात आंतरराष्ट्रीय व्यापाराची सुरुवात सातवाहन काळापासून झाली. भडोच, नालासोपारा, कल्याण, ठाणे, चौल ही पश्चिमी तटावरील काही महत्त्वाची बंदरे होत. तेथून आंतरराष्ट्रीय व्यापार चाले.

पहिल्या शतकाच्या सुरुवातीस पसरलेले सातवाहन साम्राज्य

या राजघराण्यातील राजांनी स्वतःला ‘ दक्षिणापथपती ‘, ‘तिसमुद्दतोय-पितवाहन ‘, ‘अप्रतिहतचक्र ‘, अशी बिरुदे धारण करून त्याद्वारे आपल्या सत्तेचे सामर्थ्य प्रदर्शित केले होते. ते त्यांनी शक – क्षत्रपांचे उच्चाटन करून सार्थ करून दाखवले. सातवाहन राजे स्वतःला वर्णाने ब्राह्मण समजत. आंध्र – सातवाहनांच्या लेखात आंध्रांचा ‘ एक ब्राह्मण ‘ म्हणजेच सर्वोच्च ब्राह्मण असा उल्लेख आहे. सातवाहन राजांच्या नावाबरोबर गौतमीपुत्र, वसिष्ठपुत्र, माढरीपुत्र अशी मातृवाचक नावे येतात यावरून त्या काळात स्त्रियांना समाजात मानाचे स्थान होते हे समजते.
या काळात वैदिक धर्माचा उत्कर्ष झाला. अश्वमेध, राजसूय, दशातिरात्र असे अनेक यज्ञ होत असत. याच काळात शैव आणि वैष्णव पंथाचा प्रारंभ झाला. ग्रीक आणि शकांनी सुद्धा वैष्णव पंथ स्वीकारल्याची उदाहरणे आहेत.

शेती हे उपजीविकेचे मुख्य साधन असले तरी त्या काळात उद्योग व व्यापार यांची मोठी वाढ झाली. व्यापारासाठी सातवाहनांनी अनेक नाणी चलनात आणली. सोने, चांदी, तांबे, शिसे आणि पोटिन या धातूंपासून बनलेली नाणी चलनात होती. सातवाहन राजे कलांचे भोक्ते व व्यासंगी होते. त्यांनी कलेला व विद्येला राजाश्रय दिलेला होता. गाथासप्तशती, बृहाद्कथा, कातंत्र अश्या विविध ग्रंथांची रचना या काळात झाली. याच काळात सांस्कृतिक जीवनात व कलाक्षेत्रात मोठी भरभराट झाली. अनेक लेण्या खोदल्या गेल्या, वेगवेगळ्या साहित्याची निर्मिती या काळात झाली.

वशिष्ठपुत्र पुळुवामी राजाच्या कारकिर्दीत तयार झालेले नासिक येथील पांडव लेणी येथील लेणी क्रमांक – ३

अश्या रीतीने सातवाहन काळात महाराष्ट्राचा सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि धार्मिक अश्या सर्वच स्तरांवर उत्कर्ष झालेला आपल्याला दिसतो.

सातवाहन राजघराण्यात एकूण ३० राजे झाले. त्यातील शिमुक, कृष्ण, सातकर्णी प्रथम, हाल, गौतमीपुत्र सातकर्णी, वशिष्ठपुत्र पुळुवामी, यज्ञश्री सातकर्णी असे अनेक महत्त्वाचे राजे होऊन गेले. त्यांची माहिती पुढील काही लेखांमध्ये घेऊ.

लेखन – प्राजक्ता देगांवकर

संदर्भ ग्रंथ –
१)सातवाहनकालीन महाराष्ट्र – डॉ. रा. श्री. मोरवंचीकर
२) महाराष्ट्राचा सामाजिक इतिहास – मुसलमानपूर्व महाराष्ट्र – वा. कृ. भावे
३) प्राचीन भारत – इतिहास आणि संस्कृती – डॉ. गो. बं. देगलूरकर

आपले ऐतिहासिक लेखन आमच्या वेबसाइटवर प्रसिद्ध व्हावे असे वाटत असेल तर आपले लेख firastimaharashtrachi@gmail.com या वेबसाइटवर नक्की पाठवा.

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!